दिंडोरी । प्रतिनिधी दि.21
पेठ तालुक्यातील बोरीचीबारी येथे पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे सदर ठिकाणी काही महिला पाण्याच्या शोधात हंडा घेऊन एका विहीरीजवळ गेलेल्या असून त्यांपैकी एक महिला विहीरीतून पाणी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून विहीरीत उतरत असल्याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ट्विटरवर प्रसिध्द झाला होता. सदर बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. त्यामुळे तालुकास्तरीय अधिकार्यांनी पाणी टंचाई परिस्थिती संवेदनशीलतेने हाताळावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.
बोरीचीबारी येथे दि. 17 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायत अधिकार्यांनी तेथील विहिर अधिग्रहण करण्यासाठी भेट देवुन अहवाल तयार करण्याची कार्यवाही केली. त्याच दिवशी संबंधीत शेतकर्यास प्रस्ताव मंजुर होईपर्यंत टँकरद्वारे सार्वजानिक विहीरीत पाणी टाकावे असे सुचीत केले होते. बोरीचीबारी येथे नळ पाणी पुरवठा योजना व्यतिरिक्त वापरातील एक सार्वजनिक विहिर आहे. सदर विहीरीत आजरोजी ग्रामपंचायत मार्फत खाजगी विहीरीतून पाणी टँकरद्वारे सोडून पाणीपुरवठा केला जात आहे. तथापी त्यास काही ग्रामस्थांचा उपसरपंच व पोलीस पाटील यांचा विरोध दिसून आला. दि.20 एप्रिल 2025 रोजी सकाळी तेथील एका महिलेस पाणी घेण्यासाठी विहीरीत उतरवुन व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने प्रसिध्द केला असे चौकशीमध्ये दिसून आले. ज्या विहिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्या विहीरीचे पाणी वापरले जात नसून त्या विहीरीला अत्यल्प पाणी दिसून आले. विहिर अधिग्रहण प्रस्ताव मान्यता मिळेपर्यंत ग्रामपंचायत बोरीचीबारी यांनी स्वखर्चाने पुरेसा पाणी पुरवठा करणार असून सार्वजनिक विहिरीत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे पाणी न टाकता ग्रामस्थांच्या घरासमोरील ड्रममध्ये ठिक ठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप सुरू केले आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी गंभीरतेने पाणीटंचाई व टंचाई निवारणार्थ केले जाणार्या उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.