दिंडोरी l प्रतिनिधी:- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम अंतर्गत “कार्यक्षेत्रातील सकारात्मक दृष्टीकोन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध मानसशास्रज्ञ प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी “कार्यक्षेत्रातील सकारात्मक दृष्टीकोन” या विषया अंतर्गत प्राध्यापकांना सकारात्मक दृष्टिकोन, शिक्षणाचे खरे उद्दिष्ट, सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्य यांचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्य करणे आवश्यक आहे. मानवाने क्षमतेनुसार समस्यांचे यशस्वी निराकरण करणे हे चांगल्या मानसिक आरोग्याचे लक्षण असून, सकारात्मक दृष्टिकोनच शिक्षकांच्या कार्यक्षमतेचा पाया ठरतो.
प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ. रसाळ यांच्या या व्याख्यानातून प्राध्यापकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांचे विचार निश्चितच दीर्घकालीन दिशा देतील. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. वाय. एम. साळुंके यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, हा उपक्रम शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व व ज्ञानवृद्धीसाठी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रा. एस. बी. लोखंडे व डॉ. जे. डी. पवार यांनीही आपली मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमातून मिळालेल्या सकारात्मक दृष्टीकोना विषयी विचार मांडले. आभार प्रा. एन. बी. बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.