महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिरसगाव आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :-दि. १४ एप्रिल २०२५, सोमवार रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, शिरसगाव ता. त्र्यंबक, जि. नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
     कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवर व विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. विद्यार्थ्यांच्या वकृत्व शैलीने सर्वांची मने जिंकली. विशेषतः ४ थीतील कु. हिमेश राऊत याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
      कार्यक्रमाचे मार्गदर्शक व व्याख्याते संदीप रुपनर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव, विश्वरत्न, भारतरत्न का म्हणतात?” याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या कार्याचा इतिहास गोष्टीच्या रूपाने मांडत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शानुसार वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे त्यांनी सांगितले.
     या जयंती सोहळ्यात वकृत्व, गायन व वेशभूषा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. संपूर्ण कार्यक्रम भिमजयंतीचा जल्लोष अनुभवत आनंदात पार पडला.
      कार्यक्रमास शाळेचे अधीक्षक अरुण बागले, अधीक्षिका पुणम बावणे, प्रा. शिक्षक योगेश्वर चव्हाण, प्रा. शिक्षिका शोभा जाधव, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी जागृती ढमढेरे व अंकुश बरफ यांची उपस्थिती लाभली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सारीका महाले (इ. ९ वी) हिने केले, तर प्रा. शिक्षिका शोभा जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने