कोकणा कोकणी आदिवासी समाज सेवा संघ ही सामाजिक संघटना महाराष्ट्रात १९९६ पासून कार्यरत असून या सामाजिक संस्थेचा २रे वैचारिक एकता महासम्मेलन, मेळावा दि.२७ एप्रिल २०२५ रोजी पालघर मधील जव्हार या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्याच्या प्रसार प्रचार तसेच नियोजना निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथील पाताळेश्र्वर शिव मंदिराच्या सभामंडपात कोकणा कोकणी आदिवासी समाजाची तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोकणा कोकणी आदिवासी समाजाच्या तालुकास्तरीय बैठकीत कोकणा कोकणी आदिवासी समाज सेवा संघाचे केंद्रीय कोअर कमिटी सदस्य गीतेश्वर खोटरे, वसंत राऊत यांनी मार्गदर्शन करताना सामाजिक संस्थेची पार्श्वभूमी व इतिहास कथन करून उपस्थित सदस्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर बैठकीत आदिवासी समुदायाच्या सामाजिक समस्या, संस्कृती रक्षण , पर्यावरण रक्षण, शिक्षण संधी, रोजगार, व्यवसाय अशा विषयांवर चर्चा विचार विनिमय करून सर्वांनुमते काही ठराव संमत करण्यात आले. याप्रसंगी प्रथम त्र्यंबकेश्वर तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात करण्यात आली. कार्यकारिणी तालुकाध्यक्ष विनोद पवार, कार्याध्यक्ष दिलीप परशुराम तलवारे, उपाध्यक्ष एकनाथ पवार, सचिव कृष्णा राऊत, सहसचिव चंदर बोरसे, प्रसिध्दी प्रमुख शंकर महाले आदींची निवड (नेमणूक) करण्यात आली. यावेळी गीतेश्वर खोटरे, वसंत राऊत, जयराम भुसारे, कादंबरी लेखक तुकाराम चौधरी, रामदास बोरसे, गोविंद साठे, केशव लहारे, रमेश लहारे, प्रल्हाद पवार, सुनील साबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.