दिंडोरी l प्रतिनिधी :-मोहाडी येथे हिंदू -मुस्लिम धार्मियांचा श्रध्येचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ चौक परिसरातील हजरत चाँदशावली बाबा दर्गाच्या संदल उत्सवाची मंगळवारी (ता. 22)कीर्तनाने सांगता झाली. संदल मधून हिंदू व मुस्लिम बांधवानी सामाजिक तसेच जातीय सलोख्याचे दर्शन घडविले. रविवारी (ता. 20)गावातून संदलची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दर्गावर फुलांची चादर चढवली नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वधर्म समभावाचे आयुष्यभर आपल्या उक्ती व कृतीतून पालन करणारे व वारकरी संप्रदायाचा श्रीसंतसेवा पुरस्कारप्राप्त कादिरबाबा हे दरवर्षी दर्गात संयोजन करतात. यानिमित्ताने दोन दिवसीय कीर्तनात पंडित महाराज व समाधान महाराज रिंगणगावकर यांची हरी कीर्तने झाली. आशुतोष देवढे, अमोल पाटील यांनी गायन, मृदंगसाथ शंतनू काठे तर रामदास क्षीरसागर यांनी हार्मोनियमची साथ केली.भजनी मंडळाचे रामभाऊ ढेपले,विठ्ठल संधान,बाजीराव गोरे, साहेबराव जाधव, भाऊसाहेब जाधव, दामोदर क्षीरसागर,अनिल गोवर्धने, संजय गोवर्धने, निवृत्ती मौले यांनी सहकार्य केले.यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मोहाडी : संदल उत्सवात मंगळवारी कीर्तन करताना समाधान महाराज रिंगणगावकर.