maharashtratribalnews

काथवडपाडा येथे आखाती सणानिमित्त विविध कार्यक्रम

देवडोंगरी प्रतिनिधी l शंकर निंबारे  
दि.१.आखाती (अक्षयतृतीया) हा सण मराठी महिन्यातील वर्षाचा शेवटचा सण आदिवासी बहुल क्षेत्रात गुजरात हद्दीलगतच्या हरसुल त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, जव्हार, विक्रमगड, डहाणू या तालुक्यात आखाती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
      त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरा पैकी काथवडपाडा येथे आखाती (अक्षयतृतीया) सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काथवडपाडा गावातील महिलांनी सात दिवस अगोदर शेणाने सारवलेल्या लहान दुथडी (टोपली) मध्ये नागली, उडीद, भात, वरी, मका इत्यादी धान्य पेरली होती. पेरलेल्या टोपलीला गौर/ गौराई असे म्हणतात. आखाती सणाच्या दिवशी महिलांनी संबळ वाद्यांच्या गजरात नृत्य गायण करत गावाभर गौराईची मिरवणूक काढली. नंतर विहरीवर जाऊन गौराईचे विसर्जन केले. यावेळी ईश्वराचे पुजन केले आणि टिपऱ्या वाजवून गौराईची गाणी गायली तसेच फुगडी खेळ, पुरषांना गौरी माळणे इत्यादी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडुन महिलांनी मोठ्या उत्साहात आखाती सण साजरा केला.
      तसेच आखाती सणानिमित्त साडेतीन दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ष २८वे. संध्याकाळी प्रवचन, किर्तन कार्यक्रम घेण्यात आले. या हरिनाम सप्ताहाचे धन्वंतरी सेवाभावी संस्थचे अध्यक्ष हिरामण महाराज घुलुम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हरिनाम सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तरुण क्रिकेट क्लब टिम काथवडपाडा यांनी परिश्रम घेतले. आखाती सणानिमित्त विविध कार्यक्रमात अक्षय आनंद प्राप्तीसाठी परीसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त, चाहते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने