maharashtratribalnews

बर्डा येथे पोस्को गुन्हा दाखल असलेल्या युवकाचा खून १२ जणांना अटक; एक फरार



बाऱ्हे प्रतिनिधी (ता.०२)
सुरगाणा तालुक्यातील बा-हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बर्डा गावात जुन्या वादातून हिरामण परशराम चौधरी (३३, रा. बर्डा) या युवकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. संशयित १२ आरोपींना सुरगाणा न्यायालयाने ६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत मयताची बहिण देवका विलास गुंबाडे (२५, रा. गोपाळपूर) हिने बा-हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
     मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींमध्ये गुरुवारी सकाळी शुल्लक कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊन संशयित आरोपींनी युवकावर हल्ला केला. गंभीर जखमी युवकास जंगलात फेकून दिले. गुरुवारी सायंकाळी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेत बा-हे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. शवचिकित्सेनंतर मृतदेह शुक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
 दरम्यान, गुरुवारी रात्री पोलिसांनी शोधमोहीम सुरू करत १२ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना सुरगाणा न्यायालयात हजर केले असता सहा मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे तपास करत आहे.
--------
मृत युवकावर पोस्को गुन्हा
ठार झालेला हिरामण चौधरी याच्यावर गावातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. वर्षभर तो कारागृहात होता. याचबरोबर त्याचा लहान भाऊ गोवर्धन चौधरी याच्यावर सुद्धा अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोस्को गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

----------
संशयित आरोपीमध्ये यांचा समावेश 
योगीराज गुंबाडे (३६), नरेंद्र राऊत (४०), मनोहर गायकवाड (२४), यशवंत शेवरे (३२), महारु कवर (२७), नंदराज वाघमारे (२५), विश्वास जाधव (२२), गणेश ढिगारे (२३), विलास पवार (२३), दिगंबर गुंबाडे (१८, सर्व रा. सांबरखल, ता. सुरगाणा), कैलास ब्राह्मणे (३५, रा. मुरदड, ता. धरमपूर) यांना अटक करण्यात आली असून भरत वाघमारे हा फरार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने