maharashtratribalnews

विद्यार्थ्यांच्या स्वागताचा आनंदसोहळ! राजे धैर्यशीलराव पवार आश्रमशाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव संपन्न

बा-हे l नामदेव पाडवी:- दिनांक १६ जून २०२५ रोजी राजे धैर्यशीलराव पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, सुरगाणा (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमा प्रसंगी इ. १ ली ते इ. ४ थीच्या नवागत बालगोपाळांचे ढोल - ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि औक्षण करून अत्यंत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. त्यांच्या पावलांचे स्मरण म्हणून पावलं उमटवण्यात आली.
     कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पांची रोपे देऊन गौरव करण्यात आला. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच इ. १ ली ते इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सुरगाणा नगर पंचायतचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेविका श्रीम. अरुणाताई व श्रीम. राधाताई वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते श्यामू आण्णा पवार, एकनाथ भोये, स्थानिक पत्रकार हिरामण चौधरी, एका.आ.वि.प्र.का. कळवण कार्यालयातील संपर्क अधिकारी प्रकाश मोहन बागुल (क. लिपिक) हे मान्यवर उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी "धरती आबा जनभागीदारी अभियान" अंतर्गत पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले व याचे डिजिटल फलक शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक जी.टी. लोखंडे  आणि शिक्षिका श्रीम. व्ही.जी. जोपळे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने