पेठ l प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास प्रकल्प पेठ, बीट - आंबे केंद्र गांडोळे येथे भारत सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत ८वा पोषण महा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश कुपोषण कमी करणे, नवजात बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देणे हा होता. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असणाऱ्या मिलेट (नाचणी, वरई, भगर इत्यादी) आणि कडधान्यांपासून पौष्टिक आहार तयार करून लहान बालकांना विविध पाककृतींच्या माध्यमातून पोषण देण्याचे महत्त्व या वेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात पोषण पालखी, भविष्याचे वटवृक्ष, बाळकोपरा, मुलीच्या जन्माचे स्वागत, कन्यापुजन, मातृपुजन, पितृपुजन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका, बालविवाह बंदी, “बेटी बचाव-बेटी पढाओ” सेल्फी पॉईंट, आदिवासी पारंपरिक लोकनृत्य, पर्यावरण जनजागृती गीत अशा विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कापूरने चे सरपंच उषाताई गवळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अमृता चौधरी, ग्रामविकास अधिकारी पी. आर. गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य देविदास गवळी, आंबे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. हेमंत कोठावदे, डॉ. सुषमा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव चौधरी, दिनकर चौधरी, पांडुरंग चौधरी, विठ्ठल चौधरी, जयराम राऊत, हेमराज कनोज, मेघराज राऊत, सरपंच आंबे मराठे मॅडम, तसेच रागिनी मॅडम, निवृत्ती आहेर, रेवगडे सर, जनार्धन डबके, चव्हाण मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांचा १००% सहभाग असलेल्या या कार्यक्रमात महिला भागिनींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली असून, रांगोळ्यांनी गांडोळे गाव सजविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. पंडीत वाकडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती मंगलाताई गायवन यांनी केले, सूत्रसंचालन रामभाऊ थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका श्रीमती द्वारकाताई चौधरी यांनी केले.