महाराष्ट्र ट्रायबल न्युज

स्वदेस फाऊंडेशनच्या पुढाकाराने आंबेपाडा (ह) बनले स्वप्नातील सुंदर गाव

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- स्वदेस फाऊंडेशनच्या पुढाकाराने स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर, समृद्ध या पाच घटकावर काम करत सुरगाणा तालुक्यातील नचिकेता गाव विकास समिती आंबेपाडा (हस्ते) हे स्वप्नातील सुंदर गाव बनविण्यासाठी पाऊल टाकत आहे.
 सक्षमीकरणाला नवे परिणाम देण्यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकाराने नचिकेता गाव विकास समिती आंबेपाडा (हस्ते) स्वप्नातील गावाचा शुभारंभ स्वदेस फाऊंडेशन टीम,परिसरातील प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून गल्ली बोळ सजवण्यात आला होता.व आदिवासी पारंपारिक पावरी,ढोल वाद्यावर सर्व महिला - ग्रामस्थ एकत्रितपणे नाचत, वाजत - गाजत प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज भोये यांनी केले तर स्वागत गीत जि.प.प्राथ. शाळेतील मुलींनी गायन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी राकेश बारस्कर तर प्रमुख पाहुणे सरपंच पुंडलिक बागुल,सुनिल भोये,मुख्याध्यापक महेंद्र ठाकरे,देवराम गांगुर्डे,विराज गीते,मनोज देशमुख,स्वदेस फाऊंडेशन सर्व टीम,नंदनवन गाव विकास समिती अध्यक्ष गिरीधर भोये हे होते.
        स्वदेस फाऊंडेशन सुरगाणा तालुका व्यवस्थापक दिपक मोरे यांनी सांगितले की, केल्याने होत आहे रे आधी केलेचं पाहिजे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा अनेक गोष्टी आपल्याकडील विद्वानांनी पंडितांनी सांगून ठेवलेल्या आहेत.मात्र याची प्रचिती अगदी काही घटनांमधून, उदाहरणं मधून आपल्याला येते.भारत हा देश अगदी विविधतेने नटलेला आहे, हे सर्वश्रुत आहे.परंतु आजही देशातील अनेक खेडी,गावे,वस्त्या,वाड्या येथील परिस्थिती बिकट आहे.कितीही काळाकुट्ट अंधार असला,तरी आशेचा एक दिवा मेहनत,चिकाटी,निरंतरता, सातत्य,श्रम,ध्यास यांच्या जोरावर प्रकाशाची वाट मोकळी करून देऊ शकतो.असाच काहीसा प्रवास आहे, ‘स्वदेस फाऊंडेशनचा. स्व’ से स्वदेस हे ब्रीद घेऊन रॉनी स्क्रूवाला आणि झरिना स्क्रूवाला यांनी एका खडतर प्रवासाला सुरुवात केली आणि १९८३ मध्ये लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आता कल्पवृक्षात रुपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे.रॉनी स्क्रूवाला यांनी ग्रामीण भागासाठी,समाजासाठी काहीतरी करायचे,या उद्देशाने १९८३ मध्ये एनजीओची स्थापना केली होती. यानंतर सन २०१३ मध्ये याचे रुपांतर स्वदेस फाऊंडेशनमध्ये झाले.आता स्वदेस फाऊंडेशन मोठ्या प्रमाणात ड्रीम व्हिलेज ही संकल्पना स्वदेस फाऊंडेशनने आखली आणि पद्धतशीर नियोजन,काटेकोर प्रक्रिया,उत्तम व्यवस्थापन,कुशल नेतृत्व,संकल्प सिद्धिस नेण्याचा ध्यास या माध्यमातून करण्यात आला.
          ग्रामीण विकासासाठी नवी दिशा स्वदेश फाउंडेशन ने यापूर्वी नाशिक व रायगड जिल्ह्यातील २५० हून अधिक गावे स्वच्छ व सुंदर स्वस्थ,सक्षम व आत्मनिर्भर या ध्येयावर आधारित स्वप्नातील गाव म्हणून विकसित केले आहेत.त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील नचिकेता गाव विकास समिती आंबुपाडा (हस्ते) हे ४७ वे स्वप्नातील गाव बनले आहे.स्वप्नातील गाव घडविण्यासाठी व गावाला एकत्र आणण्यासाठी स्वदेश फाऊंडेशन प्रतिनिधी अरुण सुबर यांनी खूप प्रयत्न केले.व आज एकत्र येऊन स्वप्नातील गाव घडविण्यासाठी स्वदेस फाऊंडेशन टीम तसेच गावातील ग्रामस्थ - महिला, शिक्षक, विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने