दिंडोरी । मनोज पाटील :- दिंडोरी तालुक्यात सध्या दिवाळी सणाची लगबग सुरु झाली असून घर रंगरंगोटीसह सजावटीसाठी नागरिकांनी खरेदी सुरू केली आहे. खरेदीसाठी नागरिकांंमध्ये उत्साह दिसून येत आहे.
वर्षभरात साजर्या केल्या जाणार्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून सार्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचा एक वेगळा दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणार्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेतील जुना कळवण रोड, बाजार पटांगण, पालखेड रोड परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली पसंती मिळावी, यासाठी दुकानदारांनीही आपली दुकाने विविध प्रकारे सजवून ठेवली आहेत. किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुले, कापड, मिठाई, गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांत गर्दी आहे. विविध डिझाइन, रंगसंगती, आकाश कंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीत अंगणात दररोज रांगोळी काढली जाते. त्यामुळे रांगोळी काढण्यासाठी दिवाळीसाठी म्हणून आलेल्या वस्तूंनी दुकाने भरून गेली आहेत. दुकानांबरोबरच फूटपाथवरही अनेक विक्रेत्यांनी रांगोळी, रंग, रांगोळीची पुस्तके, रांगोळीचे छाप, सुगंधी उटणे विक्रीसाठी आणल्या आहेत. या वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीत प्रामुख्याने खरेदी होते ती कपड्यांची. त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. पगार, बोनस हातात आल्याने दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. विशेषत: लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीनिमित्त बाजारात खर्याखुर्या वाटणार्या आर्टिफिशियल मेणबत्त्या, पाण्यावर चालणार्या पणत्या दाखल झाल्या आहेत. बॅटरीवर चालणार्या या मेणबत्या सजावटीसाठी वापरल्या जातात. यात विविध रंगही उपलब्ध आहेत. प्रत्येकांला हवाहवेसा वाटणारा विविध रंगातील, विविध ढंगातील आकाशकंदील सध्या बाजारात आल्याने नागरिकांचे लक्ष त्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठा आकाश कंदीलानी मोठ्या प्रमाणावर नटल्या आहे.