बाऱ्हे l नामदेव पाडवी:-राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' एकता दौड बाऱ्हे येथे आयोजित करण्यात आली होती. या भव्य दौडला मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र बाऱ्हे येथील प्रशिक्षणार्थी, बाऱ्हे परिसरातील तरूण - तरूणी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पोलीस पाटील, नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिक ग्रामीण
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आणि बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने बिरसा मुंडा चौक ते सर्कलपाडा अशी भव्य एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये माजी सभापती मंदाकिनी भोये,
पोलीस पाटील संघ उप तालुकाध्यक्ष हंसराज खांबाईत, माजी जि.प.सदस्य गोपाळराव धुम, सरपंच देविदास गावीत, राजेंद्र निकुळे, मनोज देशमुख, गोरख महाले, विराज गीते, जगदीश पाडवी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहभागींनी "विविधता मध्ये एकता हा देशाचा अभिमान आहे, म्हणून भारत माझा देश महान आहे.", "लोगोंको दो एकता का ज्ञान, उनके अंदर जगाओ नया सन्मान, अनेकता मे एकता भारत की विशेषता.", "जोड सको तो सबको उसका नाम है एकता, इसी से मिलती है दुनिया मे सफलता, देश तभी बनेगा महान, जब एकता बनेगी हमारी पहचान." अशा हातात घेतलेल्या फलकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. दौड सुरू होण्यापूर्वी सहभागी विद्यार्थी, उपस्थित मान्यवर यांचे स्वागत सहा. पोलीस निरीक्षक गीते यांनी केले. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी सहा.पोलीस निरीक्षक प्रदीप गीते म्हणाले की, "भारताच्या स्वातंत्र्यानंतर जी संस्थाने होती ती वेगवेगळी होण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडता आणि पूर्वीचा हिंदुस्थान हा अखंड राहावा यासाठी प्रयत्न करून एक अखंड भारताची संकल्पना मांडली. त्यामुळे या लोहपुरुषाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन एकता दौड काढत साजरा केला जात आहे." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थित सर्वांचे आभार मानले. बाऱ्हे परिसरातील माजी सभापती, पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून ७४०० रूपये मदतनिधी जमा करून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच बाऱ्हे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांचे एक दिवसाचे मानधन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना देण्याचे सुरगाणा पोलीस पाटील संघ उप तालुकाध्यक्ष हंसराज खांबाईत यांनी जाहीर केले.