दि.१३ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र हद्दीलगतच्या वनविकासच्या राखीव वनपरिक्षेत्रात वनकक्ष १३२, देवडोंगरा फाट्याजवळ येथे वनविकास वनक्षेत्रातील बोरीपाडा वनविभागाचे व रायता वनविभागाचे वनाधिकारी तसेच पेठ येथील फिरते गस्ती पथकाचे वनाधिकारी यांच्या हाती सुमारे तीन लाखांचा खैर लाकूड मुद्देमाल लागला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवडोंगरा, कास येथील वनविकासच्या राखीव वनपरिक्षेत्रात बोरीपाडा विभाग, रायता विभाग व फिरते पथकाचे पेठ मधील वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी फिरते पथक गस्त करून वनसंरक्षणाची कामे करत असतांना वनविकास च्या राखीव वनक्षेत्रातून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैर झाडांची तोड करून गुजरात राज्यात वाहनाने वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी देवडोंगरा व कास येथील गुजरात महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवरील गावलागत अवैधरित्या खैर लाकूड तस्करी करणाऱ्या संशयितांना मुसक्या आवळण्यासाठी रात्री सापळा रचण्यात आला होता. रात्री दोन वाजेच्या सुमारास देवडोंगरा, कास या भागातुन जीजे २० एएच ६६०१ या क्रमांकाच्या तवेरा गाडीत खैराचे लाकुड (ओडके) भरुन संशयित खैर तस्करी करणाऱ्यांची टोळी गुजरातकडे पळून जात असल्याचे आढळून आले. पथकाने पाठलाग करुन देवडोंगरा फाट्याजवळ वनकक्ष १३२ भागात खैर लाकडाने भरलेली तवेरा गाडी पकडली. वनविभागाच्या पथकाने खैर तस्करी करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री अंधाराचा फायदा घेत संशयित खैर तस्करी फरार झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनामध्ये खैर लाकडाचे ११ नग ०.८८२ घनमिटर (अंदाजे तीन लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कार्यवाही नाशिक वन प्रकल्प विभागातील बोरीपाडा, रायता व फिरते पथक पेठ यांनी संयुक्तपणे केली आहे. सदरच्या कार्यवाहीत नाशिक वन प्रकल्प विभागातील बोरीपाडा वनपरिक्षेत्राधिकारी सुजित शिंदे , रायता वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, वनपाल अभिजीत कोळी, धनराज पवार, वनरक्षक माधव पाडदे, आकाश लोणारे, विजय मेहत्रे रोहित पगार, वाहन चालक देविदास बोंबले इ. यांनी केली.
पुढील वन गुन्हे कामाचे तपास नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक सिधेश सावड्रेकर (भा.व.से) नाशिक वन प्रकल्प विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉ.एस.एन.नेवसे (म.व.से.) व सहाय्यक व्यवस्थापक श्री. प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी सुजित शिंदे व रमेश बलैया हे करत आहेत
फोटो
वनविभागाच्या पथकाने जाप्त केलेला खैर लाकडाचा साठा आणि तवेरा वाहन.