महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

दिंडोरी । प्रतिनिधी:- तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. काल दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर 65 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करुन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेचे नातेवाईकांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले.
    काल रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र नागरिकांची लगबग सुरु होती. दुपारी 4 वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे (65) ह्या शेतात काम करीत असतांना मागील बाजूने येवून बिबट्याने झडप घातली. बिबट्याच्या डरकाईने व जनाबाई बदादे यांच्या ओरड्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या ही बाब लक्षात आली. जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात ऊसाकडे पळाले. त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेवून चाललेला दिसला. यावेळी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले. परंतू मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने जनाबाई ह्या जागीच मयत झाल्या. त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वनविभागाचे अधिकारी तत्काळ पोहचले नाही तसेच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून व दिंडोरी शहरातील चौथा बळी असल्याने संप्तत नागरिकांनी नाशिक - सुरत महामार्गावर रास्ता रोको सुरु केला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला परंतू सारखे बळी होत चालल्याने दिंडोरीकरांनी प्रेत रस्त्यावर तसेच ठेवत वनविभागाचा निषेध व्यक्त केला. वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनपाल अशोक काळे यांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यात आला. अखेर पाटील व काळे यांनी लेखी आश्‍वासन दिले. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजुत काढली. नंतर नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतला. जनाबाई बदादे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दिंडोरी येथे रात्री 8 वाजता अंत्यविधी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने