बोरगाव l लक्ष्मण बागुल:- सुरगाणा तालुक्यातील केम पर्वतावर मंगळवारीपासून तीन दिवस यात्रोत्सवास सुरुवात होणार असून मंदिरासह मूर्तीला रंगरंगोटी करण्यात आली आहे. सुरगाणा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
केम मातेच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरातचे लाखोंच्या संख्येने भाविक येतात. गुजरातमधील अनेक कुटुंबीयांची केममाता कुलदेवता आहे. ब्रिटिश काळात केम पर्वतावर चढण्यासाठी सहा पायऱ्या बनवण्यात आल्या. परंतु, सातवी पायरी खोदताना काही चमत्कार घडल्याने ते काम बंद करण्यात आल्याचे पूर्वज सांगतात. केम डोंगरावर दोन भुयार असून पूर्वेस छोटेसे तळे आहे. धनत्रयोदशीच्या रात्री डोंगरावरील वनस्पती प्रकाशित होते, असेही अनेक जाणकार सांगतात. यामुळे काही जण केम पर्वताला संजीवनी पर्वत असेही संबोधतात. सपाटीपासून पाच किलोमीटर पायी चढावे लागते. यात्रेसाठी डांगराळे, राहुडे, गोगुळ, हरणटेकडी, शिंदे (दि) रोकडपाडा, पंगारबारी, मांजरपाडा या गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. सोमवारी सकाळी हिरामण गांगुर्डे, मन्साराम गांगुर्डे, शिवाजी लिलके, संदीप गांगुर्डे, भाऊराव लिलके, माधव गांगुर्डे, योगेश गांगुर्डे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
-
सात नद्यांचे उगमस्थान
केम पर्वतावर सात नद्यांचा उगम होतो. यातील नार, पार, उनंदा पश्चिम वाहिनी असून वाझडी, भोरी, गिरणा व कादवा या पूर्व वाहिनी आहेत. एकाच पर्वतावरून सात नद्यांचा उगम हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.